
दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱया निळवंडे धरणाच्या कामांना महाविकास आघाडी सरकारने गती दिली असून, या कालव्यांसाठी धरणालगतचा महत्त्वाचा आयसीपीओ बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, आज शेवटची ब्लास्टिंग करून हा बोगदा खुला करण्यात आला. यावेळी निळवंडे कालव्यांची कामे जलद गतीने पूर्ण करून 2022 पर्यंत लाभक्षेत्राला पाणी मिळेल, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
निळवंडे धरणाच्या पायथ्यालगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते धरणालगतचा महत्त्वपूर्ण बोगदा ब्लास्टिंग करून खुला करण्यात आला. यानंतर थोरात यांनी अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील ऍक्युरेड एरिया, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द, ढोकरी, खानापूर, रेडे, सुगाव खुर्द, कुंबेफळ, कळस खुर्द, तांभोळ येथील कालव्यांच्या कामाची पाहणी केली.
मंत्री थोरात म्हणाले, नगर जिह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱया या धरणाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात केल्यानंतर धरणाची भिंत उभी राहिली. दुष्काळी भागाला पाणी देण्याकरिता मोठमोठय़ा बोगद्यांची कामेही पूर्ण केली. मात्र, भाजप सरकारच्या कार्यकाळात ही कामे पूर्णपणे ठप्प होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या कालव्यांना पुन्हा गती दिली.
2022च्या पावसाळ्यापर्यंत दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी धरणाच्या इतिहासात सर्वांत जास्त 495 कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी दिला. या कामांसाठी निधी कमी पडणार नाही. दोन्ही कालव्यांवरील विविध पूल, स्ट्रक्चरल कामे लवकरात लवकर पूर्ण करून 2022 पर्यंत एकाच वेळेस दोन्ही कालव्यांद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱयांना पाणी मिळेल, यासाठी अत्यंत जलद गतीने काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.






























































