उसाप्रमाणेच दुधालाही ‘एफआरपी’चा विचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दुधाला लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेले दर पूर्ववत होण्यासाठी दूधखरेदीचे दर वाढविण्यात येतील. शिवाय असे संकट शेतकऱयांवर पुन्हा कोसळू नये, यासाठी उसाप्रमाणेच दुधालाही ‘एफआरपी’ लागू करणारा कायदा करण्याचा विचार सुरू आहे. हा कायदा सहकारी आणि खासगी दूध संघ व कंपन्यांना लागू होईल,’ अशी ग्वाही पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिल्याची माहिती ‘किसान सभे’चे डॉ. अजित नवले यांनी दिली.

दूधदरप्रश्नी राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी किसान सभा, शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहमटे, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार डॉ. अनिल बोंडे, किसान सभेचे डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, शेतकरी प्रतिनिधी धनंजय धोरडे, विठ्ठल पवार, दूध संघाचे प्रतिनिधी रणजित देशमुख, प्रकाश कुतवळ, दादासाहेब माने, गोपाळराव म्हस्के, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार उपस्थित होते.

लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रतिलिटर 35 रुपये दर तातडीने सुरू करा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही, यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमारविरोधी कायदा करा, साखर व्यवसायाप्रमाणे दुग्धव्यवसायाला किमान आधारभावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाटय़ासाठी ‘रेव्हेन्यू शेअरिंग’ असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा, राज्यातील अनिष्ट ‘ब्रॅण्डवॉर’ रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रॅण्ड’ धोरण स्वीकारा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावर वादळी चर्चा झाल्यानंतर दुधाला लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेले दर पूर्ववत होण्यासाठी दूधखरेदीचे दर वाढविण्यात येतील. शिवाय असे संकट शेतकऱयांवर पुन्हा कोसळू नये, यासाठी उसाप्रमाणेच दुधालाही ‘एफआरपी’ लागू करणारा कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचा तोडगा काढण्यात आला.

ऊसक्षेत्राप्रमाणे दुधालाही ‘रेव्हेन्यू शेअरिंग’चे धोरण लागू करण्याबाबत बैठकीत सर्वसंमती झाली नाही. रेव्हेन्यू शेअरिंगबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती मंत्री सुनील केदार यांनी केल्याचे डॉ. अजित नवले यांनी दिली.