मानखुर्द बनतोय नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा अड्डा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई, ठाणे, मीरा रोड, नालासोपारा परिसरात राहणारे नायजेरियन ड्रग्ज तस्कर मानखुर्द परिसरात येऊन ड्रग्जची विक्री करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे. याचीच दखल घेत मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने पूर्व उपनगरावर वॉच ठेवला आहे. परिणामी घाटकोपर युनिटच्या हाती एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर लागला असून त्याच्याकडून एमडी व कोकेनचा दहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन येथे एक नायजेरियन ड्रग्ज माफिया कोकेन आणि एमडीचा साठा विकण्यासाठी येणार असल्याची खबर घाटकोपर युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने त्या परिसरात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार तो नायजेरियन ड्रग्ज तस्कर त्या ठिकाणी येताच पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 60 ग्रॅम एमडी आणि 35 ग्रॅम कोकेनचा साठा मिळून आला. उपनगरांमध्ये ड्रग्जचा सप्लाय करणाऱया नायजेरियन टोळीचा तो पंटर असून तो हा ड्रग्जचा साठा कोणाला विकणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत.