
फलटण तालुक्यातील सरडे या छोटय़ाशा गावातील प्रवीण जाधव हा तिरंदाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या या यशाचा गावकऱयांना मोठा अभिमान वाटत आहे. त्याच्या या कर्तुत्वाने सातारा जिल्हा व महाराष्ट्राची मानही अभिमानाने उंचावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका मजुराच्या मुलाच्या यशाचं तोंडभरून काैतुक केलं आहे.
प्रवीण जाधवला अगदी लहानपणापासून तिरंदाजी या खेळाची आवड होती. वयाच्या अवघ्या 12 किंवा 13व्या वर्षी त्याच्यातील हे काैशल्य पहिल्यांदाच सर्वांसमोर आले. चौथीत असल्यापासून तो तिरंदाजीकडे आकर्षित झाला होता. पुढे क्रीडा प्रबोधिनीमधून त्याने संभाजीनगर, नंतर पुणे, दिल्ली या ठिकाणी तिरंदाजीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. प्रवीण जाधवची घरची परिस्थिती खूपच बेताची असून आई शेतमजूर आणि वडीलदेखील सेंट्रिंगच्या कामावर रोज जातात. रोज काम केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. अशी बिकट परिस्थिती असतानादेखील प्रवीण जाधवने कष्ट आणि जिद्द उराशी बाळगली. देशासाठी खेळण्याचे स्वप्न आणि जिंकण्याचे एकच ध्येय समोर ठेवून तो वाटचाल करत राहिला.
प्रवीण जाधवच्या कर्तृत्वाचे काैतुक करताना पंतप्रधान म्हणाले, टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी संघात अशा तळागाळातून आलेल्या अनेक जिद्दी खेळाडूंचा समावेश आहे. अशा खेळाडूंचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ातील आहे. तो उत्तम तिरंदाज आहे. त्याचे पालक कुटुंब चालविण्यासाठी मजुरी करतात. आता त्यांचा मुलगा टोकियोला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्याच्या पालकांनाच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रवीणची ही गगनभरारी आणि त्याचा हा प्रवास फार प्रेरणादायी आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


























































