एलिसन फेलिक्सला पाचव्यांदा ऑलिम्पिकचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने कारकिर्दीत पाचव्यांदा ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यात यश मिळवले. 35 वर्षीय एलिसन फेलिक्स ही 400 मीटर शर्यतीत काैशल्य पणाला लावण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. पात्रता स्पर्धेत दुसरे स्थान पटकावत तिने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.

एका मुलीची आई असलेल्या एलिसन फेलिक्सला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दहाव्या ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालण्याची संधी असेल. पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्यास या अमेरिकन धावपटूला ऑलिम्पिकच्या इतिहासात जमैकाच्या मार्लिन ओटे या धावपटूच्या विक्रमाची बरोबरी करता येईल. पात्रता स्पर्धेत एलिसन फेलिक्स एक वेळ पाचव्या स्थानावर धावत होती. मात्र अखेरच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत तीने दुसरे स्थान मिळवले. एलिसन फेलिक्सने 50.02 सेंकद वेळ नोंदवली, तर विजेत्या क्वानेरा हायेसपेक्षा ती 0.24 सेंकदाने पिछाडीवर राहिली. तिच्या मागे 0.01 सेंकद पिछाडीवर राहिलेल्या वेडलन योनाथास हिला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.

‘‘माझ्यासाठी हा गौरवास्पद क्षण आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. या वेळी आपण पात्र ठरू की नाही याबाबत मनात धाकधूक होती. मात्र मी आव्हानासाठी सज्ज होते. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे माझ्यासाठी नक्कीच भूषणावह बाब आहे.’’ – एलिसन फेलिक्स