गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पंढरपूर तालुक्यातील शेतकरी शनिवारी रात्रीपासून झालेल्या आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने सुखावले आहेत. पंढपूर तालुक्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत सरासरी 37.77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात 64 मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे.
पंढरपूर तालुक्यात पावसाचा जोर असल्याने ओढे व नाल्यांत पाणी वाढू लागले आहे. यामुळे तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांना दक्षता घेण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. नाले, ओढय़ांलगत असणाऱया लोकांनी पाण्याचा अंदाज घेत सुरक्षित स्थळी जावे व सहकार्य लागल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. नदीपात्रात पुराची लगेच शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी उपरी, भंडीशेगाव, पळशी, सुपली, तिसंगी या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे. गतवर्षी कासाळ ओढय़ाला पाणी आल्याने अनेकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. यंदा प्रशासनाने अगोदरपासूनच तयारी केली आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसाने पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर बसस्थानकासमोरील शॉपिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाण्याचे तळे झाले होते.
सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना
संभाव्य अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱया आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करून तसेच समन्वय ठेवून सतर्क राहावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.





























































