मुंबई – दोन डोस घेतलेल्या फक्त 26 जणांना कोरोना! दुसऱ्या लाटेत चार लाख बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत सुमारे चार लाख मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली असली तरी यामध्ये कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेल्या फक्त 26 जणांनाच कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर लसीचा पहिला डोस घेतलेल्या 10 हजार 500 जणांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लस घेतली तरी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. वर्षभर पालिकेने कोरोनाविरोधात लढा दिला. अखेर 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. असे असतानाच फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. यामध्ये जानेवारीअखेर 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या थेट दहा हजारांवर गेली. त्यामुळे मुंबईसाठी टेन्शन वाढले होते. मात्र पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आता दुसरी लाटही पूर्ण नियंत्रणात आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या 500 ते 700 च्या दरम्यान नोंदवली जात आहे. दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी काळजी घेणे आवश्यक असताना अनेक बेजाबदार नागरिक कोरोना नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाला पूर्णपणे घालवण्यासाठी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे आणि वारंवार हात धुवावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

दिवसाला दीड लाखावर डोस देण्याची क्षमता

मुंबईत सध्या पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालये अशा 390 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी उपलब्ध यंत्रणेनुसार एका दिवसांत दीड लाखाहून जास्त लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता आहे. 26 जून रोजी एकाच दिवसांत मुंबईत 1 लाख 54 हजार 228 इतके डोस देऊन पालिकेने हे सिद्धही करून दाखवले आहे. त्यामुळे आगामी काळात जसे जास्तीत जास्त डोस मिळतील तसे लसीकरणा वाढवण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत 50 लाखांवर डोस देण्यात आले असून 10 लाखांवर अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी कंपन्यांचे आयसीएमआरला पत्र

12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी काही कंपन्यांनी आयसीएमआरला परवानगीसाठी पत्र दिले आहे. ही परवानगी मिळाल्यास लहान मुलांच्या लसीकणाचाही मार्ग मोकळा होणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रायल घेण्यासाठी पालिकेने आपली यंत्रणाही सज्ज ठेवली असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.