‘या’ जिल्ह्यात सेल्फीवर बंदी, नियम मोडल्यास पोलीस कारवाई करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यापुढे तुम्ही कधी गुजरातमधील डांग जिल्ह्यात गेलात तर ही बातमी कधी विसरू नका. कारण डांग जिल्ह्यामध्ये सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी संपूर्ण जिल्ह्यासाठी असली तरी तिची कडक अंमलबजावणी ही खासकरून नयनरम्य ठिकाणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. जर तुम्ही हा नियम मोडलात तर तुमच्याविरोधात पोलिसी कारवाई केली जाऊ शकेल.

23 जून रोजी एक जिल्हा दंडाधिकारी टी.के.दामोर यांनी एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकाद्वारे जिल्ह्यात सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आल्याचे नागरिकांना कळवण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या बातमीत म्हटलंय की ही बंदी स्थानिकांसोबत जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांनासुद्धा लागू असणार आहे. या पत्रकामध्ये पावसाळ्यात आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी नदी, नाले, ओढे, धबधबे या ठिकाणी जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात ‘सरकारी नोकराला कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी’ गुन्हा दाखल होऊ शकेल.

जिल्हा दंडाधिकारी टी.के.दामोर यांनी या नियमाबाबत बोलताना म्हटले की सेल्फी बंदीचा निर्णय फक्त पर्यटनस्थळांपुरता मर्यादीत नाहीये. रस्ते, कडे, धबधबे, नद्या अशा सगळ्या ठिकाणांसाठी तो लागू असणार आहे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी हा नियम संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असेल असे त्यांनी सांगितले. कोरोनासाठीचे निर्बंध थोडे शिथील झाल्यामुळे डांग जिल्ह्यात पर्यटकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे. डांगमध्ये येणाऱ्या काही पर्यटकांना सेल्फीच्या नादात जीव गमवावा लागला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी समाजसेवी संस्थांच्या मदतीने धोकादायक ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. मात्र तरीही दुर्घटना कमी झाल्या नाहीत. यामुळे सेल्फीवर बंदी घालण्याचा नियम तयार करण्यात आला असून या दुर्घटना रोखण्यासाठी पोली कठोर पावले उचलतील असे डांगचे पोलीस अधीक्षक आर.एस.जाडेजा यांनी सांगितले.