नगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता; महापौर, उपमहापौरांच्या अधिकृत निवडी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनपाच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर केली आहे.

महापौर व उपमहापौरपदासाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. महापौरपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांनी अर्ज दाखल केले होते. आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी डॉ. भोसले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगरसचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते.

महापौरपदासाठी शेंडगे यांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते वैध ठरले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांचे तीन अर्ज होते. अर्जाच्या छाननीमध्ये तीनही अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. तो अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी भोसले यांनी या निवडींची अधिकृत घोषणा केली.

प्रलंबित विकासकामे पूर्ण करणार – महापौर शेंडगे

शहरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचा मानस नव्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला. शहरातील पाणीप्रश्न महत्त्वाचा असून, सुरू असलेली ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्यांची बिकट परिस्थिती झाली असून, ते रस्ते दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणार आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचीही दुरुस्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘हरित नगर’ करण्याचा संकल्प – उपमहापौर भोसले

उपमहापौर गणेश भोसले यांनी शहरात रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा मानस व्यक्त केला आहे; तसेच महापालिकेतील अधिकाऱयांना शिस्तही लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहर स्वच्छ व सुंदर कशा पद्धतीने केले पाहिजे, तसेच हरित नगर करण्याची संकल्पना घेऊन आपल्याला आगामी काळामध्ये वाटचाल करायची आहे, असे ते म्हणाले.