उर्वरित आयपीएलमध्ये खेळणार परदेशी क्रिकेटपटू, मॅक्सवेल, वार्नरसह बहुतांश ऑस्ट्रेलियन खेळाडू उपलब्ध असणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित लढती 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. उर्वरित आयपीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटू नसतील, असे बोलले जात होते. मात्र ऑस्ट्रेलियाचे बहुतांश खेळाडू राहिलेल्या या टी-20 स्पर्धेत खेळणार असल्याचे वृत्त आहे. याचबरोबर इतर देशांच्या खेळाडूंसाठीही ‘बीसीसीआय’ संबंधित बोर्डांशी चर्चा करत आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी आयपीएलचा फायदा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने हिंदुस्थानातील टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप यूएई आणि ओमान या देशांत स्थलांतरीत केला आहे. उर्वरित आयपीएलही यूएईमध्येच होणार आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलमध्ये खेळणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना फायदेशीर ठरणार आहे.

बांगलादेश, विंडीज दौऱयातून माघार

पॅट कमिन्स सोडून बांगलादेश व वेस्ट इंडीजच्या दौऱयातून माघार घेतलेले बहुतांश ऑस्ट्रेलियन उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मार्कस स्टोइनीस व डॅनियल सॅम्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विंडीज व बांगलादेश दौऱयातून विविध कारणे सांगून माघार घेतली आहे. यातील पॅट कमिन्सने आपण उर्वरित आयपीएल खेळणार नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र इतर सर्व खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असण्याची शक्यता बळावली आहे.

बीसीसीआय परदेशी बोर्डांच्या संपर्कात

उर्वरित आयपीएलमध्ये अधिकाअधिक परदेशी क्रिकेटपटू खेळावे यासाठी ‘बीसीसीआय’ने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. ‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आदी देशांच्या क्रिकेट बोर्डांशी याबाबत चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे उर्वरित आयपीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटूंच्या खेळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आयपीएलच्या उर्वरित 31 लढतींसाठी कोणते परदेशी खेळाडू उपलब्ध असतील याबाबत ‘बीसीसीआय’कडून 15 जुलैला आयपीएल संघ मालकांना माहिती दिली जाणार आहे.