
हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात हिंदुस्थानला श्रीलंकेसोबत 3 एक दिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात 13 जुलैला होणाऱ्या पहिल्या एक दिवसीय लढतीने होईल. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा संतप्त झाला आहे. हिंदुस्थानच्या दुय्यम संघाशी मालिका खेळण्यासाठी सहमती दर्शवल्याने रणतुंगा यांनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले आहे.
श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या संघाचे नेतृत्व शिखर धवन याच्याकडे आहे. मात्र या संघात विराट कोहली, रोहित शर्मा यासारखे अनुभवी खेळाडू नाहीत. हे सर्व खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असून येथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या संघात पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया सारखे तरुण खेळाडू आहेत.
हा आमचा अपमान
श्रीलंकेच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा हिंदुस्थानचा दुय्यम संघ असून त्यांच्यासोबत खेळणे म्हणजे श्रीलंकन क्रिकेटचा अपमान आहे. तसेच श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने टेलिव्हिजन मार्केटिंगसाठी या दुय्यम संघासोबत खेळण्यासाठी सहमती दर्शवल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदुस्थानने आपला सर्वोत्कृष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर पाठवला आणि कमकुवत संघ येथे खेळण्यासाठी पाठवला. यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डच दोषी असल्याचे ते म्हणाले.
खराब प्रदर्शनावर ओढले तारेशे
रणतुंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील श्रीलंकेच्या खराब प्रदर्शनावरही निशाणा साधला. श्रीलंकेने गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेली टी-20 मालिका 3-0 अशी गमावली. श्रीलंकेचा हा सलग पाचव्या मालिकेतील पराभव आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतही श्रीलंकेचा संघ 2-0 असा पिछाडीवर आहे. यासह बायो-बबलचे उल्लंघन केल्यामुळे तीन प्रमुख खेळाडूंना इंग्लंड दौरा सोडून मायदेशी परतावे लागले. यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची नाचक्की झाली.























































