
इंग्लंड दौऱयावर असलेली ‘टीम इंडिया’ पाच सामन्यांच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेपूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. डरहॅममध्ये विराट कोहलीच्या सेनेचा पॅम्प लागणार आहे. काउंटी संघासोबत हिंदुस्थानी संघ चारदिवसीय आणि तीनदिवसीय असे दोन सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होणार आहेत.
कोहलीने केली होती
सराव सामन्यांची मागणी
जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेतील फायनलनंतर ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी काउंटी संघासोबत सराव सामन्यांची मागणी केली होती. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे (ईसीबी) तशी मागणी केली होती. ‘ईसीबी’ने दोन सराव सामन्यांना लागलीच मान्यता दिली.
टीम इंडिया 15 जुलैला एकत्र येणार
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘टीम इंडिया’तील सर्व क्रिकेटपटूंना 15 जुलैला डरहॅममध्ये एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या फायनलनंतर हिंदुस्थानी क्रिकेटपटू बायो-बबल सोडून सुट्टीवर गेले होते. 15 जुलैला सर्व क्रिकेटपटू लंडनमध्ये पुन्हा एकत्र येणार होते. मात्र आता त्यांना डरहॅममध्ये जमण्यास सांगितले आहे. ‘टीम इंडिया ’ एक ऑगस्टपर्यंत डरहॅममध्ये सराव करणार असून मग सराव सामने खेळणार आहे. डरहॅममध्ये दाखल होताच ‘टीम इंडिया’ला बायो-बबलचे नियम लागू होतील.
पहिली कसोटी नॉटिंगहॅममध्ये
हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात नॉटिंगहॅममध्ये 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसरी कसोटी 12 ते 14 ऑगस्ट (लॉर्ड्स), तिसरी कसोटी 25 ते 29 ऑगस्ट (लीड्स), चौथी कसोटी 2 ते 6 सप्टेंबर (द ओवल) आणि पाचवी कसोटी 10 सप्टेंबरपासून (मँचेस्टर) सुरू होणार आहे.
‘टीम इंडिया’चा कसोटी संघ
रोहित शर्मा, शुभमन गील, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा. राखीव खेळाडू अभिमन्यू ईश्वरन, प्रसिध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला.































































