पाच महिन्यांत 7473 जणांना लागण, फक्त एक मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत मुंबईत शून्य ते 9 वर्षांपर्यंतच्या 7473 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असली तरी यातील फक्त एकाच मुलाला कोविडमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या वयोगटातील मुले धडधाकट असल्याचे समोर आले आहे. संभाव्य तिसऱया लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात असताना 50 टक्क्यांहून जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याचे समोर आल्यानंतर आणखी एक सुखद बातमी मिळाली आहे.

सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ आणि सहव्याधी असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका होता. कोरोनामुळे दीड वर्षात मुंबईत एकूण 15451 जणांना जीव गमवावा लागला आहे. या मृतांमध्ये 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या 13228 आहे. तिसऱया लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मुलांमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोनाचा सामना करण्यास निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.

19 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्थितीमध्येही सुधारणा

n फेब्रुवारीच्या मध्यानंतर 19 फेब्रुवारी ते 1 जून 2021 या कालावधीत शून्य ते 9 वर्षे वयोगटातील 7473 जणांना कोरोनाची लागण झाली. तर गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत 12845 मुलांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 55 टक्के मुले तर 45 टक्के मुली कोरोनाबाधित झाल्या.
n दीड वर्षाच्या कोरोनाकाळात 10 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 32 हजार 854 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये मुले 56 टक्के तर मुली बाधित होण्याचे प्रमाण 44 टक्के आहे. या वयोगटातील एकूण 40 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पहिल्या लाटेत 31 तर दुसऱया लाटेत 9 जणांचा मृत्यू झाला.

तरीही पालिका सज्ज

मुलांमध्ये अँटीबॉडीज वाढल्याचे प्रमाण आणि लागण व मृत्यूचे प्रमाणही घटल्याचे समोर आले असले तरी पालिका मात्र ‘इशाऱयाच्या पार्श्वभूमीवर’ तिसऱया लाटेसाठी विशेष कार्डियाक वॉर्डचे नियोजन करून सज्ज आहे. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष वॉर्ड, बेड, आयसीयूच्या व्यवस्थेबरोबरच लहान मुलांसोबत गरजेनुसार पालकांनाही सोबत थांबण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.