
26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱया अजमल कसाबला कायदेशीर प्रक्रियेद्वारे शिक्षा करण्यात आली. पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करताना सीबीआयने कायदा डावलला, कायद्याची प्रक्रिया न पाळताच एफआयआर दाखल करण्यात आला त्यामुळे परमबीर यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपावरून सीबीआयने आपल्यामागे लावलेला चौकशीचा ससेमिरा बेकायदेशीर आहे, असा जोरदार युक्तिवाद अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आज हायकोर्टात केला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी परमबीर यांनी याचिकेद्वारे केली होती. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत सीबीआयला प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांची नागपूर येथे चौकशी केली व त्यांच्या विरुद्ध थेट गुन्हाही दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी अॅड. सोनल जाधव यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की त्यांच्या विरोधातील खंडणीचे आरोप बेकायदेशीर आहेत. एफआयआर नोंदवताना सीबीआयने कायद्याची प्रक्रिया पाळलेली नाही. गुन्हा दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाची परवानगी सीबीआयने घेणे बंधनकारक असताना ती घेतलेली नाही, सीबीआय कायदा डावलू पाहते आहे का असा सवालही अॅड. देसाई यांनी उपस्थित केला.
तर देशात अराजकता माजेल
देसाई म्हणाले की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 अ नुसार पोलीस किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेने एखाद्या सरकारी सेवकावर खटला भरण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी. मात्र तसे झाले नाही. एवढेच काय तर केवळ आरोपांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप हे कोणीही आणि कोणावरही केले जाऊ शकतात, प्रत्येक आरोप खरा मानला तर देशात अराजकता माजेल. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.
एफआयआरमध्ये काय म्हटले आहे?
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सचिन वाझे याच्या पुनर्नियुक्तीबद्दल अनिल देशमुख यांना पूर्ण कल्पना होती. आणि गृहमंत्री म्हणून ते पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या व पोस्टिंगमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप करीत असत.






























































