
अहमदपूर तालुक्यातील शेंद्री -सुनेगाव येथील मन्याड नदी पात्रात सख्खे बहिण भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ अशा एकाच कुटुंबातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
शेंद्री- सुनेगाव येथील रोहिणी (छकुली ) ज्ञानोबा जायभाये (वय 14), प्रतिक ज्ञानोबा जायभाये (वय 9) आणि गणेश तुकाराम जायभाये (वय 12) हे तिघेजण शेतालगत असलेल्या मन्याड नदीच्या काठावर शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. शेळ्या चरत असताना नदी पात्राच्या कडेला लाकडाच्या ओंडक्यावर बसून ते खेळत होते. अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे ओंडका पाण्यात उलटला आणि ते पाण्यात बुडाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. शेंद्री- सुनेगाव व परिसरातील गावात बालक्यांच्या मृत्यूची वृत्त समजताच घटानास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी या प्रसंगी परिसरातील खास पोहणारे, आग्निशामक दलाचे जवान यांनी तब्बल दोन तास पाण्यात पोहून मृत मुलांचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले. यावेळी किनगाव, अहमदपूर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या मुलांचे शेवविच्छदन ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे करण्यात आले असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.



























































