पालिका सीबीएसई शाळांमध्येही पुस्तके देणार, 89 लाखांची पुस्तके खरेदीसाठी स्थायी समितीत प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांसाठी पालिका पुस्तके देणार आहे. यासाठी पालिका 89 लाख रुपयांची पुस्तके खरेदी करणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या 12 शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी 4 हजार 275 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

पालिकेने दोन वर्षांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू केली होती. या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून सीबीएसई बोर्डाच्या 11 नव्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या. एप्रिल महिन्यात लॉटरी पद्धतीने या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे तर आता पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. या शाळांसाठी पुस्तकांची निवड करण्यासाठी पालिकेने उपशिक्षणाधिकारी यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने काही एनसीआरटीने ठरवलेली पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही खासगी प्रकाशांच्या पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी पालिका 89 लाखांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.