
रशियन बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस स्पुटनिक वी ही लवकरच सरकारी लसीकरण केंद्रात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसंच, ही लस गावपातळीवर लसीकरणासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती कोविड -19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा यांनी दिली आहे.
सध्या ही लस फक्त खासगी आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध आहे. जर या लसीचा पुरवठा नियमित राहिला तर ही लस सरकारी लसीकरण केंद्रात मोफत दिली जाऊ शकते, असं अरोरा यांचं म्हणणं आहे. या लसीची साठवणूक करण्यासाठी उणे 18 अंश सेल्सियस इतकं तापमान लागतं. त्यासाठी पोलिओ लसीच्या साठवणुकीवेळी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्ड चेनची सुविधा उपयुक्त ठरू शकेल.
ही सुविधा स्पुटनिकची लस साठवण्यासाठी मोफत दिली जाईल. त्यामुळे ही लस गावपातळीवरही पोहोचण्यास शक्य होईल, असं अरोरा यांचं म्हणणं आहे. लसींच्या अनियमित पुरवठ्यामुळे काही भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पण, येत्या काळात त्याची नियोजनबद्ध आखणी होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
आतापर्यंत 34 कोटी लोकांना लस दिली गेली असून जुलै अखेरपर्यंत 12 ते 16 कोटी डोस दिले जातील, अशी शक्यता अरोरा यांनी वर्तवली आहे. जुलै अखेरपर्यंत 50 कोटी डोसचं लक्ष्य पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या लसीकरणात अधिकांश कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा समावेश आहे. या दोन्ही लसींचं उत्पादन वाढवण्यासोबतच स्पुटनिक व्ही या लसींची आयात आणि मॉडर्ना तसंच झायडस कॅडिलाच्या नवीन लसींचा समावेश होण्याने दररोज 50 लाख डोसचं प्रमाण येत्या काळात दिवसाकाठी 1 कोटी इतकं होऊ शकतं, अशी आशाही अरोरा यांनी व्यक्त केली आहे.




























































