
ओबीसी समाजाचा एम्पेरिकल डेटा मागण्याचा विषय होता. पंतप्रधान आणि राज्यपालांकडे जी मागणी केली तोच ठराव अधिकृतपणे आम्ही विधिमंडळात केला तर त्यात चुकीचे असे काय केले. त्यात एवढय़ा मिरच्या झोंबण्याचे कारण काय? ओबीसी समाजाबद्दल जर आपल्या मनात द्वेष असेल तर तो वेगळ्या मार्गाने व्यक्त करायचा होता. ओबीसी समाजाच्या मागणीसाठी ठराव केला तेव्हा यांनी आकांडतांडव केला, मराठा समाजावेळी ठराव केला तेव्हा ते सभागृहात नव्हते, यातून विरोधकांना नक्की काय साधायचे आहे, असा सवाल करतानाच सभागृहात सरकारला तोंड देणे जमत नसेल तर ईडी, सीबीआयचे दबावतंत्र वापरणे याला तुम्ही लोकशाही म्हणाल, पण जनता ते मानणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ सदस्य कालच्या घटनेने अवाक झाले त्याप्रमाणे मीही अवाक झालोय. आज विरोधी पक्षातील सदस्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे. उत्कृष्ट संसदपटू हे परिमाण ठरल्यानंतर हल्ली सभागृहात जे काही चाललंय तो प्रयत्न कामकाजाचा दर्जा खालावण्याचा की उंचावण्याचा प्रयत्न आहे, असा सवाल करताना त्यांनी दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा खालावला जात आहे, अशी खंत व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणी बाब
विधिमंडळ म्हणजे कुस्तीचा आखाडा नाही. ते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीचे एक मंदिर आहे. महाराष्ट्राच्या मागील अनेक वर्षांत जे घडले नाही त्याचा अनुभव पहिल्याच टर्ममध्ये मला आला आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं आहे. ही आपली संस्कृती नाही, परंपरा नाही. ओबीसी आरक्षणासाठीच्या एम्पिरिकल डेटाची माहिती जर विरोधी पक्षनेत्यांना निरुपयोगी वाटत होती तर त्यांनी तसे सांगायला हवे होते. पण काय झालं माहीत नाही. मनातला ओबीसी समाजाविषयीचा द्वेष उफाळून आला का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
विरोधी पक्षनेत्यांना माहिती कशी मिळते?
जी माहिती अद्याप कोणाला मिळालेली नाही. सरकारकडून म्हणून अधिकृत मागणी करूनही माहिती मिळाली नाही. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी जी माहिती दिली ती त्यांना कशी मिळाली, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी जे सांगितलं की या माहितीमध्ये देशासंदर्भात 8 कोटींहून अधिक चुका आहेत. राज्याच्या बाबतीत 69 लाख चुका आहेत. केंद्राकडे असलेली माहिती सरकारला मिळत नाही. यांना कशी मिळते, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
भास्कर जाधवांच्या बातीत जे घडले ते शिसारी आणणारं
लोकप्रतिनिधींकडून जनतेची अपेक्षा असते. त्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्याला सभागृहात पाठवले आहे. पण तिथे गेलेल्या सदस्यांचे जे वागणे काल जनतेला पाहायला मिळाले ते शरमेनं मान खाली जाणारे होते. ओबीसी समाजाचा जो अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी ठराव मांडला जात होता. हे सुरू असताना वेडवाकडे वागायचे, अध्यक्षांसमोरील माईक ओढायचे, बेंबीच्या देठापासून ओरडायचे ही लोकशाही नाही. त्यानंतर भास्कर जाधवांच्या दालनात जे काही घडले ते शिसारी आणणारे वर्णन होते. ही राज्याची परंपरा नाही. असा चुकीचा पायंडा पडता कामा नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या वागणुकीबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली.
ईडी, सीबीआय हे लोकशाहीला पांढरा रंग फासण्याचं काम आहे का?
आमच्यावर आरोप करतात की लोकशाहीला काळिमा फासला, लोकशाहीचा गळा घोटला. मग त्यांच्याकडून जी काही दबावतंत्रे येतात ईडी, सीबीआय वगैरे ते लोकशाहीला पांढरा रंग फासण्याचं काम सुरू आहे का? जे काम तुम्हाला सभागृहात जमत नसेल तर तुम्ही सांगा आम्हाला सरकारला तोंड देणं कठीण होतंय, म्हणून आम्ही आमच्या अधिकारांचा गैरवापर करून दबावाखाली आणतोय. त्याला लोकशाही ते मानतील देशातील जनता मानणार नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावर्ले.
केवळ सत्ता एके सत्ता हा अट्टाहास… विरोधकांनी लवकर सुधारावं!
राज्यात कोरोनानंतर उद्भवणारी परिस्थितीही आर्थिकदृष्टय़ा त्रासदायक आहे. ही परिस्थिती बघितल्यानंतर देशातील जनता आमचं काय होणार, कसं जगायचं त्या दृष्टीने हालचाल करणार याकडे लक्ष ठेवून आहे. पण त्याकडे लक्ष देणार नसू आणि केवळ सत्ता एके सत्ता हा अट्टहास करणार असू तर तर एकूणच दिवस खूप वाईट आहेत, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला.
दोन दिवसांत जनतेच्या हिताचं काम केलं याचं समाधान!
दोन दिवसांच्या अधिवेशनात जनतेच्या हिताचे काम करणारे हे सरकार आहे. आम्ही जनतेला समाधान देऊ असं काम केलेलं आहे, या बाबीचे समाधान आम्हाला आहे. यासाठी विधिमंडळात जे सदस्य उपस्थित होते त्यांना मी धन्यवाद देतो. पण ज्यांच्याकडे घडू नये ते घडलं त्यांनी लवकर सुधारावं. सरकारचं कर्तव्य जनतेचं समाधान करणं, विरोधी पक्षाने समाधानी होणं न होणं हा त्यांचा प्रश्न आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
30 वर्षं एकत्र राहून काही झालं नाही तर आता काय होणार
मोदी भेटीनंतर सरकार पडणार. शिवसेना-भाजपसोबत जाणार असे बोलले जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले. मी आता उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री या दोघांच्या मध्ये बसलो आहे. निघायचं म्हटलं तर कोणत्या बाजूने निघणार, अशी मिश्कील टिपणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. 30 वर्षं एकत्र राहून काय झालं नाही तर आता काय होणार, असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप युतीबद्दल बोलताना लगावला.
केंद्राच्या योजनांसाठी माहिती वापरता हा घोटाळा आहे का?
आणखी एक प्रश्न येतो हा डेटा केंद्राच्या योजनांसाठी वापरला जातो. 8 कोटी चुका ज्या माहितीत आहे. ती चुकीची माहिती योजनांसाठी वापरतात, पण राज्याला ती माहिती देत नाही. मागितल्यानंतर आग लागल्यासारखे थयथयाट करता. हा घोटाळा आहे का? चुकीची माहिती प्रधानमंत्र्यांच्या योजनेत कशी वापरू शकता, असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
कोरोना स्थिती आटोक्यात येईल तेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह राज्यपालांच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे दिलीत. थोडय़ा कठोर नियमांची महाराष्ट्र सरकार अंमलबजावणी करतेय. 72 तासांच्या कोरोना चाचणीचा निकाल आवश्यक होता. पण माझी स्वतःची चाचणी आदल्या दिवशी करावी लागली. कामामुळे ही जर मुंबईत राहणाऱया माझी अपरिहार्यता असेल तर ग्रामीण भागातून येणाऱया लोकप्रतिनिधींची चाचणी ते कधी आणि कुठे करणार? त्यानंतर निवडणूक ठरवल्यावर सर्व सदस्यांना कार्यक्रम कळवावा लागतो. ज्या दिवशी निवडणूक घ्यायची त्याच्या मध्यान्हापर्यंत अर्ज भरण्याची अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्यावेळी कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल त्यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
शिवसेना–भाजप एकत्र येणार?
30 वर्षे युतीत असताना काही घडले नाही तर आता काय घडणार?






























































