रुपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थान अजरामर राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, चित्रपटसृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकीर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रुबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थान अजरामरच राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.