मुंबईत दोन दिवस मुसळधार कोसळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील जवळपास 20 दिवस दडी मारणारा मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. हा मान्सून महाराष्ट्रावर प्रसन्न होऊन राज्यात सर्वत्र धो धो बरसात करणार असल्याची आनंदवार्ता आहे. पुढील चार पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. तसेच उर्वरित राज्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा व काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या हजेरीमुळे दुबार पेरणीचे संकट टळून शेतकऱयांना दिलासा मिळणार आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे एका मोठय़ा विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. परिणामी, पुढील चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज कुलाब्यातील प्रादेशिक हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भुते यांनी गुरुवारी वर्तवला.

आता पुन्हा पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये मान्सून सक्रिय होईल. परंतु पश्चिम राजस्थानला मान्सूनसाठी आणखी वाट पाहावी लागेल, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

मुंबईकरांना उकाडय़ापासून दिलासा

गुरुवारी मुंबई शहर परिसरासह बोरिवली, गोरेगाव, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सांताक्रुझमध्ये 17 मिमी. तर कुलाब्यात 7.6 मिमी. आणि ठाण्यात 11.4 मिमी. पाऊस झाला.

इथे पडणार मुसळधार पाऊस

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिह्यांसह मराठवाडय़ातील लातूर, बीड, परभणी, नांदेडमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. तसेच राज्याच्या काही भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.