
सार्वजनिक ठिकाणी तसेच उघडय़ावर थुंकणाऱया नागरिकांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची मुंबई उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. लोकांनी थुंकू नये यासाठी पालिकेने मराठी टीव्ही चॅनल, रेल्वे स्थानक, रेडिओ व शहरातील जंक्शनवर जाहिरांतीद्वारे मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी, असे आदेश मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज प्रशासनाला दिले.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया नागरिकांकडून दंडवसूलीची अंमलबजावणी होत नसल्याने अर्मिन वांद्रेवाला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
चित्ररथ, मोबाईलवर संदेश, कॉलर टय़ूनवर जनजागृती करण्याबाबत विचार असून पालिकेने वांद्रे येथील भिंतीवर न थुंकण्याबाबत चित्रे काढून जनजागृती केली आहे. थुंकणाऱयांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉटसअॅप क्रमांक पुरवण्याची योजना असल्याचेही पालिका प्रशासनाने खंडपीठासमोर सांगितले.



























































