‘एसएनएफ’मुळे शेपूझरीतील पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले, जलयोजनेचे लोकार्पण उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गम भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, त्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक वर्षांपासून सोशल नेटवर्किंग फोरम कार्यरत आहे. या फोरमने आज नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील शेपूझरी येथे जलयोजनेचे लोकार्पण करीत आणखी एका गावाला पाण्याच्या टंचाईतून मुक्त केले. पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध झाल्याचे समाधान या सोहळ्याप्रसंगी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

पेठ तालुक्यातील शिवशेत आंबे शिवारातील मोठ्या देवाचा डोंगर म्हणजेच शेपूझरी परिसरातील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याअभावी खूप हाल होत होते. सर्वत्र कोरडवाहू क्षेत्र असल्याने शेकडो ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी दूरवर भटकावे लागायचे. विखुरलेल्या वस्त्यांमुळे सरकारी टँकरनेही पाणीपुरवठा होत नव्हता. उन्हाळ्यात तर येथे गंभीर परिस्थिती असते. या गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमची टीम कामाला लागली.

या समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञांकडून परिसरातील एक पाण्याची जागा शोधण्यात आली. या ठिकाणी ग्रामस्थांनी श्रमदानातून एक विहीर खोदली. विहिरीला मुबलक पाणीही लागले. यानंतर फोरमच्या वतीने विहिरीचे बांधकाम करून देत जलयोजना साकारली. या विहिरीत भरपूर पाणी असल्याने आता ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही, हा आनंद आहे, अशी भावना फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केली.

हे लोकार्पण फोरमचे सुरगाणा तालुका समन्वयक विजय भरसट आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. या योजनेसाठी येथील रामदास शिंदे, संदीप कडाळ, नारायण देशमुख, राजू गायकवाड, प्रशांत जाधव, गोवर्धन गायकवाड, हरी पारधी, कृष्णा वारड, लहु जाधव, विजय भरसट यांनी सहकार्य केले.