
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱया इंग्लंड संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि एकच खळबळ उडाली. इंग्लंड संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाला नवखा संघ मैदानावर उतरवावा लागला. मात्र या नवख्या संघाने पाकिस्तानची पुरती दाणादाण उडवली. इंग्लंडच्या या संघाने नऊ गडी राखून विजय मिळवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली. या सामन्याआधी इंग्लंडच्या संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अचानक संघात बदल केला. या सामन्यात इंग्लंडकडून खेळणाऱया अनेक खेळाडूंकडे अनुभवाची कमतरता होती. त्यामुळे अनुभवी पाकिस्तानविरुद्ध हा संघ तग धरू शकणार नाही, असे सर्वांना वाटत होते.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीसमोर पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडाली. पाकिस्तानला 35.2 षटकांत फक्त 141 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडने पहिल्या षटकाच्या तीन चेंडूंवर पाकिस्तानची 2 बाद शून्य अशी अवस्था केली होती. इंग्लंडचा गोलंदाज साकीब महमूदने 42 धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाकिस्तानकडून मिळालेले 142 धावांचे माफक आव्हान इंग्लंडने अवघा एक गडी गमावत लीलया ओलांडले. इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलानने नाबाद 68 धावा केल्या. जॅक क्राउलीने नाबाद 58 धावांची खेळी साकारली. इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.




























































