
>> कचरू चांभारे
अभिषेक कुंभार लिखित ‘काहून’ कादंबरी मागच्याच महिन्यात प्रकाशित झाली.न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्याकडून ती प्रकाशित करण्यात आली आहे.मागील काही वर्षातल्या न्यू ईराचे प्रकाशित साहित्य पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल प्रतिपश्चंद्र, दि आंत्रप्रन्योर, मुकद्दर अशा नावीन्यपूर्ण व उत्कंठावर्धक विषयास त्यांनी हात घातलेला आहे, शिवाय यामधून नवीन धाटणीचे लेखक जन्माला आले ते वेगळेच.या तरुण लेखकांकडून वाचक व मराठी साहित्य विश्वास मोठी आस आहे.
‘काहून’ कादंबरी व लेखक अभिषेक कुंभार यांचा परिचय करून देत आहे. पुस्तकाचे नाव ‘काहून’ असं वाचताक्षणीच मी लेखकाला फोन लावला होता. ‘काहून’ हा शब्द उर्दू धाटणीचा व माझ्यासाठी पूर्णतः अपरिचित असल्यामुळे माझ्या मनात जिज्ञासा होती. लेखकाने मला थेट कादंबरीच पाठवून दिली त्याबद्दल लेखक अभिषेक कुंभार यांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो.
मनोगतात शेवटच्या परिच्छेदात लेखकाने मांडलेल्या एका वाक्यापासून मी ‘काहून’ ग्रंथविशेष मांडण्यास सुरुवात करतो. लेखक म्हणतो की, आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगून त्याचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करत येणाऱया पिढय़ांना आपल्या क्षात्रतेजाची ओळख व्हावी अन् ‘काहून’ वाचत असताना नेमकं हेच जाणवतं की, लेखकाने आपला क्षात्रतेजाचा वारसा सक्षमपणे पेलला आहे. नावीन्यपूर्ण नाव, इतिहासात आलेला छोटासा संदर्भ, काळाच्या गर्भात दडलेल्या अनामिक नावांना घेऊन उणंपुरं अडीचशे पानांचं कथानक मांडणं हीसुद्धा लेखकाची शौर्यकथाच म्हणावी लागेल.
‘काहून’ ही एक सत्य युद्धकथा आहे. शिपायानं कधी आपला व आपल्या पिढय़ांचा इतिहास विसरू नये या शिपाई धर्माला जागलेल्या शूरवीर मराठा सैनिकांची ही कथा आहे. शिवजन्मापूर्वी व शिवजन्मानंतरही अनेक मराठा सरदार सैनिकांनी आपली तलवार गाजविलेली आहे. ‘काहून’ हीसुद्धा अशीच शासनकर्ता राजा बदलला तरी मराठा तलवार कधीच म्यान करत नसतो हे सांगणारी कथा. ‘काहून’ हे अफगाणिस्तानातील एका पठारावरचं छोटंसं गाव. त्या पठारावर आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत तब्बल पाच महिने मराठा सैनिकांनी दिलेला लढा म्हणजे ‘काहून’. या लढाईत मराठा इन्फंट्रीचा मालक इंग्रज सरकार आहे, इंग्रज शासन ज्याच्यासाठी मदत म्हणून लढवायला लावतं तो शाह शुजा पानिपतच्या रणसंग्रामातला मराठय़ांचा कट्टर वैरी अब्दालीचा नातू आहे. म्हणजे ज्याच्यासाठी लढतोय तोही शत्रूच व ज्याच्या ध्वजाखाली लढतोय तोही शत्रूच, पण तरीही या शौर्यगाथेला सलामच करावा वाटतो. कारण इमान म्हणजे काय असतं? प्राणाच्या शेवटच्या अस्तित्वापर्यंत लढणं म्हणजे काय असतं? यांची उत्तरे ‘काहून’ देतं.
प्लासीच्या लढाईने इंग्रजांना हिंदुस्थानी राजकारणात सत्ताधारी होण्याची स्वप्ने पडू लागली.1818 साली पेशवाईच्या रूपातलं मराठा शासन संपलं अन् हळूहळू इंग्रजी सत्तेने संपूर्ण देश काबीज केला. दिल्ली हे तेव्हाही राजकारणाचे केंद्र होते व आजही आहे, पण दिल्लीच्या सत्तेसाठीचा मार्ग पंजाब, महाराष्ट्र, बंगालमधून जातो. इतिहास साक्षीला आहे की, या तीन प्रांतांतल्या नरवीरांनी दिल्लीसाठी शिर तळहातावर घेतलेले आहे. डोंगरदऱया, ताशीव कातळ, ऊन-वारा-पाऊस अशा आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे सामर्थ्य कोणात असेल तर ते इथल्या मराठा सैनिकांत आहे.
शाह शुजाला मदत व इंग्रज पलटणीस विसावा म्हणून ‘काहून’ आपल्या पदरात असावं हा इंग्रजांचा होरा होता, पण हे ‘काहून’ टोळीवाल्यांच्या ताब्यात होते. आपल्या हाताखाली काम करणाऱया सैनिकांना मित्रत्वाचा मान देणारा क्लार्क हा इंग्रज अधिकारी, मराठा सुभेदार जाधव यांच्या अजोड पराक्रमाची कथा म्हणजे ‘काहून’ आहे. टोळीवाले व प्रतिकूल परिस्थितीतला निसर्ग व नियती अशा तीन शत्रूंशी झालेली लढाई आहे. सैनिकांची लढाई ही केवळ शत्रुसैन्याशीच असते असे नव्हे, तर ती लढाई भोवताली वाढून ठेवलेल्या परिस्थितीशीही असते याची प्रचीती ‘काहून’ वाचताना येते. ‘काहून’मधले एक काल्पनिक पात्र हे सिंहगडाजवळील कल्याणचे असल्यामुळे कादंबरीत अनेक वेळा शिवकाल डोकावतो…अन् हो, शिवकाल डोकावायलाच हवा. कारण तिथंच तर आपला प्राण आहे.
या सत्य युद्धकथेचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. पुणे शहरातही एका रोडचे नाव ‘काहून रोड’ आहे. कमीतकमी संदर्भ साहित्य उपलब्ध असताना लेखकाने मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तर मांडला आहे. ‘काहून’सारख्या प्रतिकूल भागात मराठय़ांच्या भरवशावर इंग्रज विजयाचे स्वप्न पाहू शकले. या सगळ्यांची मीमांसा ग्रंथातच वाचावी. कथेतली काही पात्रं काल्पनिक व काही पात्रं सत्य आहेत. ‘केसरी’ या चित्रपटाची आठवण देणारी ही कादंबरी आहे.केसरी ही इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानाची अजरामर गाथा आहे. ही कथा आहे 1897 ची, पण ‘काहून’ ही कथा केसरीच्या पन्नास वर्षे आधीची म्हणजे 1840 ची आहे. सुभेदार जाधव व त्यांचे सर्व सहकारी ताटात वाढलेलं मरण कसं हसत हसत पचवतात याची कथा म्हणजे ‘काहून’.
मराठय़ांची अपरिमित शौर्यगाथा ‘काहून’
लेखक – अभिषेक कुंभार
प्रकाशक – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ – 244, मूल्य – रुपये 300/-

























































