
शरीरातील रक्तवाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह कमी करून लठ्ठपणा कमी करू शकणारे ‘मेडिकल डिव्हाइस’ पालिकेच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि रेडिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. हेमंत देशमुख व इंटरर्वेशनल रेडिओलॉजीचे डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी बनवले आहे. पाच वर्षांच्या अथक परिश्रम व संशोधन-अभ्यासाने बनवण्यात आलेल्या या ‘मेडिकल डिव्हाइस’ला अमेरिकन पेटंट ऑफिसने ‘संकल्पना एकमेव’ असल्याचे सांगत पेटंट बहाल केले आहे.
पालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱया मोफत आणि दर्जेदार उपचारांमुळे केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱयातून रुग्ण विविध उपचारांसाठी येत असतात. यातच पालिकेच्या रुग्णालयांत राबविण्यात येणाऱया अभिनव उपक्रमांमुळेही मुंबईचे नाव जगात उज्ज्वल होत आहे. यानुसार पालिकेच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व डॉ. क्रांतिकुमार राठोड यांनी एप्रिल 2016 पासून वैद्यकीय क्षेत्रात रक्तवाहिन्यांच्या आजारांवर संशोधन सुरू केले. याची संकल्पना अमलात आणण्यासाठी एक मेडिकल डिव्हाइस बनवण्यात आले. या मेडिकल डिव्हाइसअंतर्गत रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कमी करता येईल याबद्दलचे संकल्पित नमुने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसकडे दाखल करण्यात आले. पाच वर्षांच्या अविरत संकल्पनेनंतर अमेरिकन पेटंट ऑफिसने ही ‘बौद्धिक संपत्ती’, संकल्पना जगात एकमेव असल्याची ग्वाही देत पेटंट बहाल केले आहे. या मेडिकल डिव्हाइसनुसार स्थुलपणावर उपचार करण्याबाबत पुढील संशोधन सुरू राहणार आहे.
महापौर, पालिकेकडून अभिनंदन
डॉ. हेमंत देशमुख आणि डॉ. क्रांतिकुमार राठोड यांच्या संशोधनातील ‘मेडिकल डिव्हाइस’ला पेटंट मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ आदी उपस्थित होते.























































