
पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्य़ा राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट-यूजी 2021) नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे.
नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठय़ाचा ठसा, दहावी परीक्षेची गुणपत्रिका, दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बारावी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र, ओळखपत्र (उदा. आधारकार्ड) यांची आवश्यकता लागणार आहे. ‘नीट’ परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ती 12 सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबर रोजी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून घेण्यात आली होती. त्यावेळी 13.66 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 1 लाख 71 हजार 500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.




























































