
पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 15पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराचे खुर्रम परिसरात ऑपरेशन सुरू होते. याच मोहिमेदरम्यान टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी जवानांवर हल्ला केला. कॅप्टन अब्दुल बासित खान या कारवाईचे नेतृत्व करत होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी 6 टेलिकॉम ऑपरेटर्सना ओलीस ठेवले आहे.






















































