यूपीतून आणलेला एक कोटीचा अफगाणी चरस अंधेरीत पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पश्चिम उपनगरातील उच्चभ्रूंसह झोपडपट्टीतील नशेबाजांना अफगाणी चरस विकणाऱया दोघा ड्रग्ज तस्करांना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने रंगेहाथ पकडले. अंधेरीच्या डोंगर परिसरात चरस घेऊन ते दोघे आले असता त्यांच्यावर पोलिसांनी झडप घातली. त्यांच्याकडे एक कोटी एक लाख 25 हजार किमतीचा चरस साठा जप्त केला.

अंधेरी पश्चिमेकडील डोंगर परिसरात एक ड्रग्ज तस्कर चरस विकायला येणार असल्याची खबर वांद्रे युनिटला मिळाली. त्यानुसार वांद्रे युनिटच्या पथकाने डोंगर परिसरात सापळा रचून मोहम्मद जाफर अब्दुल कलाम सिद्दीकी (26) आणि समीर शब्बीर शेख (25) या दोघे तेथे येताच त्यांच्यावर झडप घातली. या दोघांकडे तब्बल दोन किलो पाच ग्रॅम वजनाचा अफगाणी चरस साठा सापडला. सिद्दीकी हा अंधेरीच्या डोंगर परिसरात चरस विकणारा मुख्य पेडलर आहे. तसेच दोघे आरोपी हे पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना चरस विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.