पुणे – ‘समृद्ध जीवन’च्या कागदपत्रांचा मोठा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक घोटाळ्यासंदर्भातील समृद्ध जीवनच्या आणखी महत्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी धायरीत छापा टाकून जप्त केले. कागदपत्रांचा पंचनामा करण्यासाठी पथकास दोन दिवस लागणार आहेत.

आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्ध 22 राज्यात 28 गुन्हे दाखल आहेत. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपुर्वी ‘सीआयडी’कडे आला. काही दिवसांपुर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेला 50 ते 60 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार ‘सीआयडी’ने जप्त केला होता. पथकाने नऱ्हे येथील समृद्ध जीवन पार्क येथे छापा टाकून समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील दुसरीकडे हलविण्यात येणारी महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. तेथे पोलिसांना एक दुकान व दोन सदनिका भरुन ठेवलेली कागदपत्रे आढळली होती. दरम्यान, गुरूवारी समृद्ध जीवन घोटाळाप्रकरणी धायरी येथेही कागदपत्रांचा मोठा साठा असल्याचे धामणे पाटील यांना समजले. त्यानंतर त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथे सदनिका भरून कागदपत्रे आढळली. गुरूवारी दिवसभर कागदपत्रांचा पंचनामा सुरू करण्याचे काम पथकाकडून सुरू होते.