
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणावपूर्ण संबंधाचे खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) फोडले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने चांगले शेजारी बनून राहावे, याची आम्ही कित्येक दिवसांपासून वाट पाहतोय. पण करणार काय, आरएसएसची विचारसरणी या मार्गात आड येतेय, असे खळबळजनक विधान इम्रान खान यांनी शुक्रवारी केले.
उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये मध्य आणि दक्षिण आशियाई देशांचे दोन दिवसीय संमेलन सुरू आहे. संमेलनात हिंदुस्थानच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेसुद्धा सहभागी झाले आहेत. या संमेलनाला इम्रान खान पोहोचत होते. त्यावेळी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने त्यांना हिंदुस्थान-पाकिस्तानमधील चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न केला. चर्चा आणि दहशतवाद या दोन गोष्टी एकाचवेळी चालू राहू शकतात का? हिंदुस्थानच्या वतीने आपल्याला हा थेट सवाल आहे, असे पत्रकाराने इम्रान यांना विचारले. त्यावर त्यांनी दोन देशांतील तणावपूर्ण संबंधाला आरएसएसची विचारसरणी जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानावर हिंदुस्थानसह आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांनी गेल्या महिन्यात कश्मीरच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा सुरू करण्याबाबत विधान केले होते.
तालिबानच्या प्रश्नावर बोलती बंद; पळ काढला
तालिबानच्या पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधावरही ‘एएनआय’ वृत्तसंस्थेच्या हिंदुस्थानी पत्रकाराने प्रश्न केला. तालिबानला पाकिस्तानच नियंत्रित करीत असल्याचा आरोप होत आहे, याकडे पत्रकाराने लक्ष वेधले. त्यावर इम्रान यांनी तोंड लपवत काहीच उत्तर न देता तेथून पळ काढला. यावेळी इम्रान यांच्या अंगरक्षकांनी प्रश्न विचारणाऱया पत्रकाराला पुढे येण्यापासून मधेच अडवले. सोबत असलेल्या क@बिनेट मंत्री शेख राशिद यांनीसुद्धा पत्रकाराला प्रश्न विचारण्यास मनाई केली.



























































