
संगमेश्वर तालुक्यात गत आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अशा स्थितीत पाण्याचा प्रवाह वेगवान असताना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथे आज दुपारी 3:30 च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (32), चेतन सूर्यकांत सागवेकर (18) दोघेही रा. धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली. या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार (27), शुभम शांताराम चव्हाण (20), राज तुकाराम चव्हाण ( 18), साईल संतोष कांगणे (17) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही.
संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे आपले सहकारी ए. एस. आय. शिंदे, पो. हे. कॉ. झापडेकर, पो. ना. मोंडे, मानके, गायकवाड यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा करुन तपासकार्य सुरु केले. या दुर्दैवी घटनेमुळे धामापूर घारेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.























































