शिवसेना मदतीला धावली रहिवाशांकडून समाधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने विक्रोळी परिसराचीही दाणादाण उडवली. शेकडो घरांत पाणी शिरले. सूर्यानगर भागात सात ते आठ घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यासाठी मदत केली. पोलीस, पालिका आणि अग्निशमन यंत्रणांसोबत समन्वय साधून रहिवाशांच्या घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यास मदत करण्यात आली.

मुंबईच्या विविध भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर इतका भयंकर होता की, विक्रोळी भागातील शेकडो घरांमध्ये मध्यरात्री पाणी शिरल्याने रहिवाशांची प्रचंड धावपळ उडाली. यामध्ये एलबीएस मार्ग पंचशील चाळ येथे पहाटेच्या सुमारास सात ते आठ घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली. या ठिकाणी बचावकार्य करण्यासाठी केवळ एकच मार्ग असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या. मात्र पालिकेचे अग्निशमन दल, पोलिसांनी मोठय़ा हिमतीने बचावकार्य केल्याचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले. घटनास्थळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही भेट देऊन आढावा घेतला. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनीदेखील घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक सूचना दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

रहिवाशांना दिलासा

बहुतांशी झोपडपट्टी भाग असलेल्या विक्रोळी परिसरातील शेकडो घरांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरल्याचा प्रकार घडला. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे पाणी तुंबल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर स्थानिक शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पालिका आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाण्याचा निचरा होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे पाण्याचा निचरा वेळीच झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला.

भरपावसात शिवसेनेचे मदतकार्य

मुंबईत सुरु झालेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील कांदरपाडा अग्निशमन केंद्र येथील शिवशक्ती नगर चाळीला पुराचे स्करूप आले होते. त्या ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये चिखलाचे पाणी भरले होते. याची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी भरपावसात कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य केले. तसेच येथील नागरिकांना चटई, ब्लँकेट, दूध, बिस्किट, खाद्य सामुग्री किट आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेविका तेजस्की घोसाळकर, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर उपस्थित होते.