
कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक, खेळाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी अर्थात पंच हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घडविण्याबाबत आपल्याकडे अद्यापि जागरूकता नाही. खेळाच्या क्षेत्रात हिंदुस्थानला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देत राष्ट्रीय पातळीवरील ठोस धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या ज्युरी अर्थात पंच समितीत निवड झालेले पहिले हिंदुस्थानी व ‘गन फॉर ग्लोरी’ या देशातील अग्रगण्य नेमबाजी (शूटिंग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंग यांनी व्यक्त केले.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) संयुक्त महासचिव, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ) या जागतिक स्तरावर नेमबाजी खेळाचे नियमन करणाऱया संस्थेच्या पंच समितीत (ज्युरी) सलग दोन वेळेस स्थान मिळवणारे पहिलेच व एकमेव हिंदुस्थानी अशी पवन सिंग यांची ओळख आहे. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया 130 देशांमधून निवड करण्यात आलेल्या केवळ 20 आंतरराष्ट्रीय पंचांपैकी ते एकमेव व पहिलेच हिंदुस्थानी होय, हे विशेष. याचबरोबर ‘गन फॉर ग्लोरी’ या संस्थेत प्रशिक्षण घेतले. इलावेनील वालारिवन व स्वरूप उन्हाळकार हे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब होय, असे पवन सिंग म्हणाले.
आपल्याकडे प्रशिक्षक असलेली व्यक्तीच ही पुढे पंच म्हणून काम करण्याकडे वळत असताना ती खेळादरम्यान प्रत्येक खेळाडूसोबत तटस्थ असण्यासंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जातात आणि म्हणूनच पंच म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे माझे मत आहे, असेही पवन सिंग यांनी नमूद केले.



























































