पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्या! शिवसेनेची ‘यूपीएससी’कडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात आलेली इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस परीक्षा त्याच दिवशी होती. पावसामुळे लोकल सेवा कोलमडल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाता आले नाही. त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने ‘यूपीएससी’कडे केली आहे.

शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी यासंदर्भात ‘यूपीएससी’चे अध्यक्ष प्रा. प्रदीपकुमार जोशी यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल वाहतूक कोलमडली होती. त्याचप्रमाणे पावसामुळे अन्य सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

लोकलने नियमित प्रवास करणाऱयांचे त्यामुळे हाल झाले होते. ‘यूपीएससी’ परीक्षेला बसलेले विद्यार्थीही परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू न शकल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला जाऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, असे खासदार देसाई यांनी या निवेदनात म्हटले आहे.