साताऱ्यात दुबार पेरणीचे संकट टळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर आता सातारा जिह्यात आषाढ सरी बरसायला लागल्या आहेत. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पावसाची रिमझिम वाढल्यामुळे शेतकरीवर्गासह सर्वसामान्य जनता सुखावली आहे. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांच्या वाढीच्या दृष्टीने उपयुक्त असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

जिह्यात मान्सूनने दमदार सलामी दिल्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे उघडीप पाहून शेतकऱयांनी खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने अपेक्षाभंग केला. पावसाने पाठ फिरविल्याने दुबार पेरणीचे संकट ‘आ’वासून उभे राहिले. नवीन लागण केलेल्या उसाचे कोंब सुकून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिह्यात कुठे कुठे तुरळक हजेरी लावणाऱया पावसाने कालपासून थोडा सूर पकडला आहे. सातारा, कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर, वाईसह अन्य तालुक्यांमध्ये आषाढसरी बरसायला सुरुवात झाली आहे. तूर्त फारसा जोर नसला तरी या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.