
सध्या सोशल मीडियावर चेन्नईच्या अण्णा दुराईची रिक्षा भाव खाऊन आहे. त्याच्या रिक्षातून प्रवास करायला लोक रांगा लावतात म्हणे. असं काय आहे त्यांच्या रिक्षात. अहो काय नाही ते विचारा. दुराईच्या रिक्षामध्ये मास्क, सॅनिटायजरची सोय आहेच. पण त्यासोबतच मिनी फ्रीजदेखील आहे. एवढेच नव्हे तर प्रवाशांना पंटाळा येऊ नये म्हणून मिनी टीव्ही, वर्तमानपत्रे, मासिके, स्नॅक्स तसेच आयपॅडदेखील ठेवण्यात आला आहे. रिक्षाचे भाडे घेण्यासाठी कार्ड स्वीपिंग मशीनपण आहे. इतक्या सगळ्या सोयीसुविधा असल्यावर प्रवास तर आरामदायी होणारच ना…
अण्णा दुराईचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. त्यात दुराई आपली घरची परिस्थिती, शिक्षण, महत्त्वाकांक्षा यावर बोलताना दिसतोय. दुराई सांगतो, मला व्यावसायिक बनायचे होते. घरच्या परिस्थितीमुळे मला शिक्षण घेता आले नाही. मी रिक्षाचालक बनलो. माझी ऑटो रिक्षा जगात नंबर-1 कशी ठरेल, याकडे मी लक्ष दिले. मी बचत केली. त्यातून पेपर, मासिके, आयपॅड, चार्जिंग पॉइंट, मिनी फ्रीज अशा सुविधा प्रवाशांना द्यायला सुरुवात केली.
प्रवाशांचा ऋणी
मी नऊ भाषांमध्ये प्रवाशांचे स्वागत करतो. या कामामुळे मी खूप मित्रमंडळी जोडली आहे. मी शिक्षकांना फ्री राईड देतो. मी स्वत:चे अॅप सुरू केलेय. प्रवाशी माझ्यासाठी परमेश्वर आहेत. मी बिझनेसमॅन बनलो नाही. पण माझ्याकडे जे आहे ते मी चांगले करतोय, असे म्हणत अण्णा दुराईने प्रवाशांचे आभार मानले आहेत.



























































