
रायगड जिह्यातील महाड तालुक्यात घडलेल्या दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोक व्यक्त केला. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतानाच दोन ते तीन दिवस हवामान विभागाच्या इशाऱयानुसार प्रशासन आणि नागरिकांनी दक्षता घ्यावी. डोंगर उतारावरील गावे व वस्त्यांतील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव, मदतकार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. मुसळधार पाऊस पडल्यामुळे रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्हय़ांमध्ये पूरपरिस्थिती आहे. कोयनेतून विसर्ग सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर भागात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अद्याप पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. पूरग्रस्त नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे तसेच अडकलेल्यांना अन्नाची पाकिटे, कपडे, औषधे आदि त्वरित मिळतील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
या वेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सीताराम पुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असिम गुप्ता आदींची उपस्थिती होती.
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्यांची सुटका
महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.
दहा ठिकाणी दरडी कोसळल्या
राज्यात एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रायगड जिह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिह्यात खेड, सातारा जिह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील काsंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.
कोरोना रुग्णांची काळजी घ्या
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिह्यांमध्ये कोविड संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यात ही आपत्ती आल्याने कोविड रुग्णांची असुविधा होऊ देऊ नका असे सांगून ते म्हणाले की, आरोग्याचे नियम पाळून, विशेषतः मास्क घालून बचाव कार्यातील लोकांनी काळजी घ्यावी.
मृतांच्या वारसांना सात लाखांची मदत
राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्याचप्रमाणे पेंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्र्यांशी चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अजित पवार यांनी राजनाथ सिंह यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली आहे. संकटग्रस्त भागांत सैन्यदलाची अधिकची मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले आहे.
– दिल्लीत शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही संरक्षणमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी दिली.































































