
पुण्यात एका हॉटेल मालकानेच दुसर्या हॉटेल मालकाचा सुपारी देऊन खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.
उरळी कांचन परिसरातील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे 18 जुलै रोजी रात्री पावणेनउच्या सुमारास हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर तलवारीने जीवघेणा वार केला. या हल्ल्यात आखाडे गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासादरम्यान हॉटेल गारवा शेजारील हॉटेल अशोकाचे मालक जयवंत बाळासाहेब खेडकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याने मामाच्या सांगण्यावरून रामदास यांच्या खूनाची सुपारी दिल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंखे, निखील पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सौरभ उर्फ चिम्या याला ताब्यात घेउन चौकशी केली असता, त्याने 8 जणांच्या मदतीने नियोजन करून रामदास यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. याप्रकरणी फरारी असलेल्या सराईत निलेश आखाते याच्यासह अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी लातूहून पकडले आहे.
व्यवसाय वाढविण्यासाठी रचला खूनाचा डाव
हॉटेल अशोकाचे मालक बाळासाहेब खेडकर यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस नुकसान होत होते. त्यातच गारवा हॉटेलचा नफा वाढत होता. त्यामुळे व्यवसायातील स्पर्धा आणि नुकसान टाळण्यासाठी बाळासाहेब खेडकर यांनी हॉटेल स्पर्धक रामदास आखाडे यांचा खून करण्याचे ठरवले. त्यानुसार भाचा सौरभ उर्फ चिम्याला हल्ला करण्यास सांगितले. त्यानंतर चिम्याने अक्षय दाभाडे, करण विजय खडसे, प्रथमेश राजेंद्र कोलते, गणेश मधुकर माने, निखील मंगेश चौधरी, निलेश आरते यांना खूनाची सुपारी दिली. त्यानुसार 18 जुलैला रात्री पावणेनउच्या सुमारास रामदास आखाडे हॉटेलच्या बाहरे बसले असताना आरोपीने त्यांच्यावर तलवारीने खूनी हल्ला करून पळ काढला. दरम्यान, दरदिवसाला एक ते दोन हजार रूपये देणार असल्याचे आमिष बाळासाहेब खेडकर यांनी आरोपींना दाखविले होते.




























































