
देशातील आयआयटी संस्थांमधील प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी केली. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून ही परीक्षा घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी ‘ट्विटर’वरून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना जेईई-मेन परीक्षा देता आलेली नाही. त्यांना नव्याने संधी दिली जाईल आणि त्या परीक्षेचे वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून लवकरच जाहीर केले जाईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई-मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे पर्यायाने जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षाही पुढे ढकलली गेली.


























































