
सातारा जिह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेचा शोध घ्यावा, तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत.
सातारा जिह्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीसह भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुटलेल्या गावांचा संपर्क पूर्ववत होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची कामे तत्काळ करा. त्यानंतर कायमस्वरूपी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करावा. जिह्यातील काही रस्त्यांवर ब्रिटिशकालीन मोऱया आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. यापुढे अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने किंवा स्लॅब टाकून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी 100 कर्मचाऱयांची टीम काम करीत आहे. त्यांना लागणाऱया बाबी उपलब्ध करून द्या. मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख, केंद्र शासनाकडून 2 लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाखांचाही लाभ देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे पाणीपुरवठय़ाच्या योजना वाहून गेल्यात किंवा खराब झाल्या आहेत, अशा गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच शासकीय मालमत्तेचे पंचनामे लवकरात लवकर करा. ज्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे त्यांना अन्नधान्य, औषधे व इतर बाबी द्या. मदत करीत असताना तांत्रिक अडचण येणार नाही असे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही अजित पवार यांनी बैठकीत केल्या.
जिह्यात पश्चिम भागात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जीवितहानी, शेतजमिनीचे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूस्खलन झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. जिह्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केली.




























































