
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्येही चांगले नाव कमावले आहे. हंटर या गाजलेल्या चित्रपटानंतर सई बॉलिवूडमधून गायब झाली होती. मात्र आता तब्बल सहा वर्षांनी सई ‘मीमी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूडमधल्या या मोठ्या ब्रेकचे कारण काय होते याबाबत आज सईने एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.’हिंदी चित्रपटसृष्टीत तुम्ही एकदा जशा प्रकारचे काम केले तशाच प्रकारचे काम तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळू लागतात. माझ्या बाबतीतही तेच झाले. हंटरनंतर मला तशाच प्रकारचे रोल मिळू लागले. मला तेच तेच पुन्हा करायचे नव्हते. माझी काही तत्व आहेत. त्यातलं एक आहे की वेगळ्या संधी शोधण्याचा, वेगळ्या प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मी मधली काही वर्ष बरीच कामं नाकारली’, असे सई सांगते.

‘मीमीसाठी मला ऑडिशनला बोलावले होते. स्क्रिप्ट वाचून वेगळी भूमिका आहे हे समजले. त्यामुळे मी ऑडिशनला गेले. त्यानंतर पुन्हा एकदा माझे ऑडिशन झाले व अखेर मला ही भूमिका मिळाली. या चित्रपटात मी एक मुस्लीम तरुणीची भूमिका करतेय. त्यासाठी मला उर्दू भाषा शिकावी लागली. त्यासाठी मी रितसर उर्दु भाषेचे धडे घेतले’, असे सई सांगते.

मीमी हा चित्रपट सरोगसीविषयी आहे. या चित्रपटात क्रिती सेनन ही मुख्य भूमिकेत असून ती सरोगेट आई होताना दाखवली आहे. या बाबत बोलताना सई सांगते, ‘सरोगसी या विषयाच्या बाबतच्या भावना या फार गुंतागुंतीच्या आहेत. एक बाई जी दुसऱ्याचे मूल आपल्या पोटात वाढवत असतो व नंतर ते मूल ते त्यांना देऊन टाकते. हे भावनिक रित्या खूप कठिण आहे. आपला समाज हा भावनाप्रधान आहे. आपल्यासाठी आपली तत्त्व आदर्श खूप महत्त्वाचे असतात. पण आता वेळ बदलत चालला आहे. त्यामुळे आता लोकं सरोगसीला मान्य करू लागले आहेत. पण आजही असा एक समाज आहे जो त्याला विरोध करतो.’





























































