
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख (94) यांचे आज रात्री साडेनऊच्या सुमारास सोलापूरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. एकाच पक्षात राहून एकाच मतदारसंघातून सलग अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूरमधील अश्विनी हाँस्पिटलमध्ये गेल्या आठवडय़ात यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सलग 54 वर्षे आमदार
गणपतराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून अकरा वेळा विक्रमी विजय मिळविला होता. ते सलग 54 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. 2009मधील निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्यापाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे गणपतराव देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते. 2018मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
अल्प परिचय
गणपतराव देशमुख यांचा जन्म 1927मध्ये झाला होता. मोहोळ-पंढरपूर येथील पेन्नूर हे त्यांचे गाव आहे. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यांसारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गणपतराव यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1962ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले.
राजकारणातील साधे, सात्विक व्यक्तिमत्त्व हरपले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्त्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सर्वाधिक काळ त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्टय़, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.

























































