सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्ह्यात आज पुन्हा पावसाची संततधार सुरू आहे. दुपारनंतर पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे सांगलीकरांत पुन्हा एकदा महापुराची धास्ती निर्माण झाली आहे.

महापुराच्या विळख्यातून सांगली शहर व कृष्णाकाठ मोकळा श्वास घेण्याच्या तयारीत असतानाच, पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. त्यात कोयना धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कृष्णा नदीपात्रात सांगलीत आयर्विन पुलाजवळ 35 फुटांपर्यंत पाणीपातळी स्थिर आहे. कृष्णेची पाणीपातळी अत्यंत संथ गतीने ओसरत आहे. काल कोयना आणि वारणा धरणांतून सोडण्यात येणाऱया पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. शिवाय वारणा धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. आज दुपारपासून सांगली शहर व जिल्ह्यातील काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही ठिकाणी संततधार, तर काही ठिकाणी अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे कृष्णा व वारणाकाठचा परिसर पुन्हा धास्तावला आहे.

19 रस्त्यांवरील वाहतूक बंद

जिल्ह्यात पावसामुळे, पुरामुळे व इतर कारणांमुळे अद्यापि मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व खानापूर तालुक्यांमधील एकूण 19 रस्त्यांवरील वाहतूक बंद पडलेली आहे. त्यामध्ये चार राज्यमार्ग व 15 प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

पंचगंगा इशारा पातळीच्या खाली

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत तुरळक पावसाने हजेरी लावली असली, तरी पुराची पातळी आज झपाटय़ाने उतरत असल्याचे चित्र आहे. काल रात्री 43 फूट धोका पातळीवर वाहणारी पंचगंगा नदी आज सायंकाळी 39 फूट इशारा पातळी खाली आली होती. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 38 फूट 8 इंच होती. सायंकाळी 8 वाजता 37.1 अशी पातळी झाली होती. तर, 32 बंधारे अजूनही पाण्याखाली होते.