
>> युगा सावंत
आजवर आपणच पोसलेल्या लाडावलेल्या त्या अहंकाराची पाठवणी आपण त्याला समजून घेऊन करायची आहे. तो स्वीकार आपला स्थायिभाव आहे हे फक्त अनुभवायचं आहे आणि स्वतःतल्या त्या ईश्वरी तत्त्वावर विश्वास ठेऊन आपल्याला फक्त चालायचं आहे. कर्म करायचं आहे. प्रश्न आपल्यात अर्जुनासारखं कुतूहल होऊन येतील आणि त्याला भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनात मिळाली ती दिशा, उत्तरं आपोआप आपल्यालाही मिळतील. आपल्या अंतरात्म्याचा आवाज अर्जुनाच्या सारथ्याहून वेगळा नाही.
विश्वात इतक्या पातळ्यांवर माणूस म्हणून प्रगती करणारे आपण स्वतःचा शोध कधी घेणार आहोत… आपलं वय, दशा, कुवत, शिक्षण, परंपरा, आर्थिक स्थिती आणि हक्काचं कारण नशीब यांना बोल लावण्याआधी आपण स्वतःला काही प्रश्न विचारणं अपरिहार्य आहे… स्वतःशी आपल्याला Deal करता येतं का? स्वतःशी आपल्याला बोलता येतं का? स्वतःसाठी मी काय करतो? माझ्या मनःशांतीसाठी मी काय करतो? स्वार्थ आणि स्वतःचा विचार, आत्मसन्मान यात आपली गल्लत व्हावी इतके वाहवत गेलो आहे का आपण?
सध्या आपण जो सतत लावलेला असतो तो तक्रारीचा सूर आठवा. पैसेच महत्त्वाचे असतात बाकी तत्त्वज्ञान मूर्खपणाच आहे. practical नाही वगैरे वगैरे. पण मग आपलं रोजचं काम आपलं प्रोफेशन, नोकरी, business जे आपण निवडलं आहे, जे करण्याचा निर्णय आपला आहे तेही आपण असंख्य तक्रारी करत करतो. ज्या कामाचा मिळणारा मोबदला आपल्याला समृद्धी, शांती, भरभराट देणारा ठरावा अशी आपली इच्छा आहे ते मिळणारे पैसे आवश्यक आहेतच; पण त्यांच्याप्रती असणारा मनोभाव आपण एकदा तपासून पाहायला हवा. आपण मनात जो भाव बाळगून ते पैसे कमावतो ती लक्ष्मी आपल्याला तेच देत असली तर तिचं काय चुकलं?
संयम आणि उशीर यात फरक आहे. आताच्या या घडीला अब्जोपती आणि सामान्य माणूस संयमाने एकाच परिस्थितीला तोंड देतो आहे. सध्या संयमाला कमी लेखणं हा ट्रेंड वाटतोय. ट्रेंड कळपाचा. फक्त अंधपणे follow केला जातो आहे तो. म्हणून हा सक्तीचा ब्रेक लागला आहे. स्वतःला नेमकं काय हवंय याचा विचार व्हावा म्हणून प्रत्येकाने अंतर्मुख व्हावं.
आता वाचताना वाटेल की, जग कुठे चाललं आहे आणि हे काय आत्मपरीक्षण वगैरे. पण आता आपण स्वतःपाशी थांबण्याची गरज आहे. आजवर जोपासलेला सारा आलेख, समीकरण, व्याख्या, strict असण्याचे आविर्भाव, मॉडर्न असण्याचे मुखवटे सगळेच पुन्हा नजरेखालून घालणं आवश्यक आहे. आपण स्वतःच्या वर्तनाचा सारासार विचार करणं आवश्यक आहे. आपलं बोलणं, वागणं यात असलेलं साधर्म्य, तफावत… आपले what’s app status आणि आचरण सगळंच एकदा नजरेखालून जायला हवं. ज्यांना साधर्म्य जाणवतंय ते आता मनात हा विषय नक्की घोळवतील आणि बाकी सोडून देतील. निर्णय ज्याचा त्याचा आहे.
पण मुद्दा हा की घटनेच्या मुळाशी जाणं त्यातून विषयाला, वर्तनाला आपल्याच संकल्पनांचे फुटलेले फाटे जे आपण नंतर सोयीस्कर विसरून जातो. गोष्टींचा होणारा विपर्यास समोरचा जाऊदे, मी टाळू शकतो का? अर्थाचा अनर्थ होतो आहे. मी नाही लोकं करतात बरं, पण मी अनर्थ करणं थांबवलं आहे का? मी मोकळेपणाने माफ केलं आहे का? आपल्या सगळ्या चुका सपशेल विसरून मी दुसऱयाला आदर्शाचे धडे दिलेत का? या सगळ्या प्रश्नांना सामोरं न जाण्याचा अट्टाहास आज आपण Stress म्हणून कुरवाळत बसलो आहोत. असं तर नसेल?
उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपल्या या संकल्पना बदलण्यापासून सुरू होतो. आजवर आपण कधी अवधानात तर कधी अनावधनात Ego पोसला आहे आपला. त्याला जरा बाजूला सारून स्वतःसाठी मी भावविरेचन करू शकतो का हा विचार मनात येणं महत्त्वाचं.
भावविरेचन म्हणजे सुयोग्य मौन आणि तरी व्यक्त होण्याची मुभा असलेलं एक माध्यम. ज्या मनातल्या कल्लोळामुळे आपण ध्यानाला दुरावलो आहे त्याच्या आधीचा हा कल्लोळ शमवणारा मार्ग.
आपलेच विचार आपल्याला गर्तेत ओढत नेतात आणि होत्याचं नव्हतं होतं ते न होऊ देण्याचा हा मार्ग. सत्याला समोर जायला बळ देणारा आणि याच जन्मात पुन्हा नव्या जन्माची संधी देणारा मार्ग ‘भावविरेचन’. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. अंधार अनुभवल्याशिवाय प्रकाशाची ओढ आणि त्याची-आपली वीण कळत नाही हेच खरं. घटना चांगली असो की वाईट मुळाशी गेल्यावर स्वतःची भेट होतेच. मग त्या घट्ट घट्ट झालेल्या अहंकाराच्या गाठी सहज सैल होतात. तो प्रकाश आपलासा होतो आणि सदैव सोबत राहतो. नुकतंच मी हे शिकले आहे की, हो अमूक अमूक असं वागला मला नाही आवडलं. मग मी तेच वागायचं का? की नेमकं उलट करायचं आणि त्या माणसाहून वेगळं चांगलं वागू शकते मी तर ते वागायचं. निर्णय माझा आहे आणि हा विचार माझा मनोभाव नक्कीच बदलून टाकतो.
आजवर आपणच पोसलेल्या लाडावलेल्या त्या अहंकाराची पाठवणी आपण त्याला समजून घेऊन करायची आहे. तो स्वीकार आपला स्थायीभाव आहे हे फक्त अनुभवायचं आहे आणि स्वतःतल्या त्या ईश्वरी तत्त्वावर विश्वास ठेऊन आपल्याला फक्त चालायचं आहे. कर्म करायचं आहे. प्रश्न आपल्यात अर्जुनासारखं कुतूहल होऊन येतील आणि त्याला भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनात मिळाली ती दिशा, उत्तरं आपोआप आपल्यालाही मिळतील. आपल्या अंतरातम्याचा आवाज अर्जुनाच्या सारथ्याहून वेगळा नाही. तो आवाज आपला ही विषाद संपवेल. काल अवघड वाटणाऱया या वाटा चालायची ऊर्जा, उमेद आपलं जगणं व्यापून टाकतील आणि ब्रम्हांडाची लय एकरूप होऊन जाईल.
भावविरेचन हे योग्य वेळी योग्य ते व्यक्त होण्यात आहे. समोरच्याला व्यक्त होऊ देण्यात आहे. ऐकण्यात आहे सहज स्वीकारात आहे. आपल्या जन्मोजन्मीच्या संचिताला, ध्येयाला स्मरून, जाणून पुढे हा प्रवास चालण्यात आहे. आपलं आचरण पुढच्या पिढीला उत्तरापाशी आपसूकच नेईल आणि मानव त्याच्यातली माणुसकी जतन करून निसर्गाचं इप्सित तडीस नक्कीच नेईल. फक्त सुरुवात माझ्यापासून होणं आवश्यक आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ आहेत.)



























































