
‘फ्रेण्डशिप डे’चे औचित्य साधून साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटातील दोस्ती गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी सोशल मीडियावरून हे गाणे शेअर केले आहे. ‘‘फ्रेण्डशिप डे निमित्त. दोन पराक्रमी रामराजू आणि भीम एकत्र येत आहेत,’’ अशा आशयाची कॅप्शन त्यांनी दिले आहे. या पोस्टमध्ये राजमौली यांनी गाण्याची यू-टय़ूब लिंक शेअर केली आहे. या व्हिडिओच्या शेवटी रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांची झलक पाहायला मिळत आहे. फ्रेण्डशिप डे च्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चाहते मैत्रीचे प्रतीक असल्याचे बोलत आहेत. अनिरुद्ध रविचंद्रन, विजय येसुदास, अमित त्रिवेदी, हेमचंद्र आणि याझीन निझर या पाच गायकांनी हे गाणे गायले आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये गाणे प्रदर्शित करण्यात आले असून एम.एम. किरवानी यांनी संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण आणि आलिया भट्ट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.



























































