
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता 83 टक्के झाला आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरीही परिसरातील साह्यकडय़ांवरून घरंगळणारे पाण्याचे ओहोळ अजूनही आवेशात वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा टिकून आहे. शनिवार व रविवार वनविभागाच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई असल्याने अनेक पर्यटकांना माघारी परतावे लागले.
वेळापत्रकानुसार भंडारदरा धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहासह धरणाच्या मोरीतून एकूण 1 हजार 257 क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने अपर मोरीद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पर्यटकांना प्रेमात पाडणारा अम्ब्रेला फॉल सुरू झाला असून, भंडारदऱ्य़ाच्या उद्यानात पर्यटकांची मांदियाळी अनुभवण्यास मिळत आहे.
निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरील पाऊसही थांबला आहे. अधूनमधून कोसळणाऱ्य़ा आषाढसरी वगळता पावसाने विश्रांती घेतल्याने वाकी जलाशयाच्या भिंतीवरून कोसळणारा प्रवाह कमालीचा मंदावला आहे. सध्या या जलाशयाच्या भिंतीवरून 789 क्युसेकचा प्रवाह निळवंडेच्या जलसाठ्यात विसावत असून, त्यात भंडारदऱ्य़ातून सोडलेले पाणीही मिसळत असल्याने निळवंडय़ाचा पाणीसाठा हलता आहे. गेल्या 24 तासांत निळवंडे धरणात भंडारदऱ्य़ापेक्षा अधिक पाणी जमा झाले आहे.
गेल्या चोवीस तासांत भंडारदरा येथे 57 मि.मी., घाटघर येथे 40 मि.मी., रतनवाडी येथे 29 मि.मी., पांजरे येथे 27 मि.मी., वाकी येथे 30 मि.मी. व निळवंडे येथे अवघ्या 05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भंडारदरात 228 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होऊन धरणसाठा 9 हजार 148 दशलक्ष घनफूट (82.87 टक्के), निळवंडेत 244 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होऊन जलसाठा 3 हजार 790 दशलक्ष घनफूट (45.51), आढळा धरणात अवघे दोन दशलक्ष घनफूट पाणी दाखल होऊन 509 दशलक्ष घनफूट (47.83 टक्के) पाणीसाठा झाला आहे. भोजापूर धरणात मात्र अद्याप नवीन पाण्याची प्रतीक्षा असून पाणीसाठा उणे आहे.
भोजापूर पाणलोटाला अजूनही पावसाची प्रतीक्षा
अकोले तालुक्याचा पश्चिम घाटमाथा पावसाने चिंब भिजत असला तरीही उत्तरेकडील आढळा धरण समूहासह भोजापूरच्या पाणलोटाला मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, जलसाठ्यातील किरकोळ वाढ वगळता या धरणांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही.
मुळा धरणात पाण्याची आवक मंदावली
रोहिणी, मृग, आर्द्रा या नक्षत्रांत मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पुनर्वसु नक्षत्रात काही वेळेपुरता झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले, तरी या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
19 जुलैला पुष्य नक्षत्रास सुरुवात झाल्याने समाधानकारक पाऊस पडेल ही शेतकऱ्य़ांना अपेक्षा होती. मात्र, या नक्षत्रातील 15 दिवस कोरडे गेल्याने पावसाची अपेक्षा व्यर्थ ठरली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात घाटमाथ्यावर पाऊस टिकून असल्याने कोतुळकडून मुळा धरणात समाधानकारक पाण्याची आवक सुरू होती. मात्र, रविवारी घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने दिवसभरात पाण्याची आवक कमी झाली आहे.
रविवारी सकाळी कोतुळकडून मुळा धरणात 2 हजार 829 क्युसेकने, तर सायंकाळी 6 वाजता 1 हजार 873 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. रविवारी सायंकाळी 6 वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा 15 हजार 796 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण 61 टक्के भरले आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची 11 हजार 674 घनफूट नोंद झाली होती.




























































