
भरधाव वेगाने गाडय़ा चालवून प्रवासी-नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारे वाहनचालक आता नजरेतून सुटणार नाहीत. यामध्ये वेगाची मर्यादा ओलांडून सुस्साट वाहन चालवणाऱया गाडय़ांवर पालिकेच्या माध्यमातून बसवल्या जाणाऱया आणि परीरक्षण केल्या जाणाऱया स्वयंचलित पद्धतीच्या ‘एएनपीआर’ कॅमेऱयाची नजर राहणार आहे. यानुसार नियम मोडणाऱया वाहनचालकांना ‘ई-चलन’ जाणार असून वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जाणार आहे.
वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि रस्त्यांवर होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी बेजबाबदारपणे भरधाव वाहने चालवणाऱया वाहनचालकांवर निर्बंध आणण्यासाठी 2017 मध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, वरळी-वांद्रे सागरी सेतू, पूर्व मुक्त मार्ग आणि जे. जे. उड्डाणपूल येथे वाहनांची स्वयंचलित पद्धतीने ओळख पटवणारे ‘एएनपीआर’ (अॅटोमेटिक नंबर प्लेट रेकग्नायशन) कॅमेरे बसविण्यात आले होते. संबंधित ठिकाणी वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने चालवणाऱया वाहनचालकांकडून ‘ई-चलन’च्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे बेदरकार ड्रायव्हिंगला आळा बसून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
अशी होणार कार्यवाही
- राज्य शासनाच्या गृह विभागाकडून सीसीटीव्ही प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही उभारणी व परीरक्षणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे 2018 मध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र वाहतूक पोलिसांकडे एएनपीआर कॅमेऱयांच्या प्रणालीसाठी तंत्रज्ञ व आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याने ही प्रणाली पालिकेने आपल्या ताब्यात घेऊन दुरुस्ती, बदली व परीरक्षण करावे असे जानेवारी 2021 मध्ये पालिकेला वाहतूक पोलिसांनी कळवले.
- ही प्रणाली बंद राहिल्यास बेजबाबदार भरधाव वाहनांवर नजर ठेवणे कठीण होत असल्याचेही कळविण्यात आले. यानुसार पालिकेने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिका 1 कोटी 58 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये नादुरुस्त पॅमेरे बदलणे, दुरुस्ती करणे आणि नियमित देखभाल करण्याचे काम पालिका करणार आहे.
































































