तूर्त पॅकेज जाहीर करणार नाही, पण तुमचे संसार उभे करणार! सांगली दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढय़ा हजार कोटींचं पॅकेज कुठे जातं कुणालाच माहीत नाही. मला अशी थोतांड करता येत नाहीत. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही. तूर्त पॅकेज जाहीर करणार नाही, पण तुमचे संसार उभे करणार. जी जबाबदारी पार पाडावी लागेल ती जबाबदारी पार पाडू, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगलीतील पूरग्रस्तांना दिलासा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भिलवडी, अंकलखोप, मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सांगली शहरातील आयर्विन पूल, हरभट रोड येथे पाहणी केली आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यातच पूराचे संकट आले. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून सांगली प्रशासनाने काम सुरू केले. सांगली जिह्यात सुमारे 4 लाख लोकांचे स्थलांतर झाले. लोकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्रथम प्राधान्य दिले. अतिवृष्टी व पुरामुळे लोकांचे आर्थिक, शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार म्हणून जे जे जनतेच्या हिताचे आहे, ते सर्व प्रामाणिकपणे करणार. हे आपले सरकार आहे तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका.

उपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱयावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशिल माने, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

आराखडा तयार करताना सर्व घटकांचा सहभाग

महापुरासारख्या आपत्ती टाळण्यासाठी तज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा केवळ तज्ञांची समिती नेमली जाते पण अहवालाची अंमलबजावणी होत नाही. तसे यावेळी न करता आतापर्यंतच्या विविध समित्यांनी केलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेला विश्वासात घ्यावे, आता जो आराखडा तयार करु त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी, जनता आणि लोकप्रतिनिधी या सर्वच घटकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आयर्विन पुलावरून पुराची पाहणी करणारे पहिले मुख्यमंत्री

सांगली शहरात येणाऱया पुराची तीव्रता आयर्विन पुलाच्या पाणी पातळीवरून मोजली जाते. 125 वर्षांपूर्वीच्या या पुलाचे बांधकाम इंग्रजांच्या काळात झालेले आहे. सांगलीतील दळणवळणासाठी हा पूल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी वा मंत्र्यांनी या पुलाचा साधी दखलही घेतली नव्हती. भिलवडी येथील पुरगस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली शहरातील आयर्विन पुलाची पाहणी केली. पाणी पातळी कुठपर्यंत आल्यानंतर नागरी वस्तीत पाणी कुठपर्यंत जाते याची सविस्तर माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिक आयुक्त नितीन कापडणीस आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांनी माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोलपणे माहिती घेतली आणि यावर काय तोडगा काढता येईल याचा अभ्यास करा, असे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.

हे सरकार तुमचे आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलंखोप, मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या गावांची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे. या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याला तुमची तयारी आहे का? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच पूरग्रस्तांनी हो असा प्रतिसाद दिला. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी सरकार तुमच्या बरोबर आहे. हे सरकार तुमचे आहे. तुमचे आशीर्वाद मोठे आहेत. तुमच्यासाठी जे करता येईल ते करू, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्तांना धीर दिला.

पूरग्रस्त भागांत कठोर निर्णय घेऊन आराखडा तयार करणार!

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठय़ा प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. विचित्र पद्धतीने पावसाचा पॅटर्न बदलत आहे. पुराने जो हाहाकार माजवला ती परिस्थिती आम्ही केवळ ऐकली आहे, पण सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व पूरगस्त विविध जिह्यांतील लोकांनी ही बिकट स्थिती अनुभवली व भोगली आहे. बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यात बदलाची आवश्यकता आहे. त्यामुळे महापुरासारख्या आपत्तीत तज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात येईल. पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांत प्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे पिंवा नदीजोड प्रकल्प या बाबींवर विचार करून तज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. त्यात पूर नियंत्रण हा महत्वाचा मुद्दा असेल. पूर नियंत्रण रेषेचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. तसेच भूगर्भाचा अभ्यास करून दरड कोसळण्यांच्या घटनांवर कशी मात करता येईल, याचाही विचार सरकार निश्चित करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 2019 चा महापूर, कोरोना आणि आता 2021 चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर आता अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण तरीही पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणे, यासाठी शासन कटीबध्द आहे. सर्व बाबींचा समतोल राखत जनतेच्या सहभागाने आपण या संकटावरही मात करू.

तुमचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमची साथ लागेल. पाण्याची पातळी मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाही. दरवर्षी पूर येतो. घरदार उद्ध्वस्त होतं. असं आपल्याच राज्यात निर्वासितासारखं राहणं योग्य नाही. त्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढू.

निसर्गाची मर्जी राखली नाही तर मोठे फटके बसत आहेत

निसर्गाची मर्जी राखली नाही तर मोठे फटके बसत आहेत, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वारंवार येणारी संकटे पाहता आतापर्यंत विकास करताना काही उणिवा राहिल्या असल्यास कठोरतेने नियमांची अंमलबजावणी करा, ब्ल्यू लाइन, रेड लाइन अशा रेषा किती दिवस काढायच्या? त्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे.  पुराचे व्यवस्थापन सुनियोजितपणे करणे आवश्यक असल्याचे सांगून सांगली शहरातील शेरी नाल्याचे पाणी अन्यत्र वळविता येईल का, यासाठीही विचार व्हावा.