
शनिवार-रविवारचा वीकेण्ड लॉकडाऊन हटवत मुंबई महापालिकेने उद्यापासून शहर-उपनगरातील सर्व दुकाने सर्व दिवस-रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटस्ना मात्र दुपारी 4 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने आज राज्यातील 14 जिल्हे वगळता इतर जिल्हय़ांतील सर्व दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महापालिकेने रात्री उशिरा मुंबई शहर, उपनगरातील नवी नियमावली जारी केली.
राज्य सरकारची नवी नियमावली कधी जाहीर होणार याबाबत सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱयांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता होती. राज्य सरकार निर्बंध शिथिल करणार या त्यांच्या अपेक्षेची सरकारने दखल घेतली आहे. त्यानुसार ब्रेक दी चेनची नवीन नियमावली आज सायंकाळी जाहीर करण्यात आली. निर्बंध शिथिल करण्यात आलेली ही नियमावली उद्या सकाळपासूनच लागू करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये जुनेच निर्बंध
कोरोना रुग्णांची वाढती संख्या गृहीत धरून 11 जिल्ह्यांमध्ये जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ठाणे येथील निर्बंधांबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिकेची उद्या मंगळवारी यासंदर्भात बैठक होणार आहे.
- सर्व दुकाने व आस्थापना आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. मात्र वैद्यकीय दुकाने आठवडय़ातील सर्व दिवस 24 तास सुरू ठेवू शकतात.
- सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवडय़ाचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.
- जलतरण तलाव आणि निकटचा संपर्क येऊ शकतो असे क्रीडाप्रकार वगळून इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे.
- चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल.
राज्यात आजपासून नवे नियम काय असतील?
- राज्यातील अत्यावश्यक वस्तूंची तसेच अन्य सर्व दुकाने, मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी 3 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
- सर्व सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने चालणे, व्यायाम, जॉगिंग, सायकलिंगसाठी सुरू राहतील.
- जिम्नॅशियम, योगा पेंद्र, सलून, ब्यूटीपार्लर, स्पा एसीशिवाय 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार.
- सर्व प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, नाटय़गृहे, मल्टिप्लेक्स बंदच राहतील.
कार्यालयाच्या वेळा बदला
मुख्य शहरांमध्ये जिथे कार्यालये आहेत आणि खासगी कार्यालये आहेत त्यांनी कार्यालयीन वेळांची विभागणी करा. हवे तर कार्यालय 24 तास उघडे ठेवा, पण कार्यालयात गर्दी होऊ देऊ नका. विशेषकरून जिथे इनडोअर ऑक्टिव्हिटी चालतात तिथे कोरोनाचा धोका जास्त असतो. ओपन एअरला हा कमी असतो. म्हणून मला असे वाटते, जर कार्यालायात आपण शिस्त लावली की आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करू शकत असतील तर तुम्ही बॅचेस करा. कामाच्या वेळा विभागून घ्या, जेणेकरून गर्दी होणार नाही. संसर्ग आटोक्यात राहील व आपले कामही सुरळीत होईल, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
कोरोनाचे नियम पाळून उत्पादन वाढवा
उद्योगांबाबतदेखील मी सांगितले आहे की, जर का मोठे उद्योग आहेत आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बायोबबल तयार करावे. जशी आपण सरकारच्या माध्यमातून फिल्ड हॉस्पिटल्स उभी केली तशी कर्मचाऱयांसाठी तयार ठेवावीत. त्यांना सरकारही मदत करेल. त्याचप्रमाणे कामगारांची राहण्याची व्यवस्था त्याच जागी करा, जेणेकरून त्यांची ये-जा वस्तीमध्ये होणार नाही. तिथल्या तिथे होत राहील आणि लॉकडाऊनची पुन्हा वेळ येणारच नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून उत्पादन वाढवा म्हणजे लॉकडाऊनची वेळच येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.





























































