
महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीचा व पुरोगामी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या पाक्षिकाचे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त ‘महाराष्ट्राचे वैचारिक धन…प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर माहितीपट तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय याच संकल्पनेवर आधारित ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रसिद्ध होणार आहे.
त्यामुळे ‘प्रबोधन’ पाक्षिकाचे 16 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2021 हे शताब्दी वर्ष राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला. या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्राचे वैचारिक धन…प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर माहितीपट तयार करण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत ‘प्रबोधन’ या पाक्षिकातील वैविध्यपूर्ण विषयांवरील महत्त्वपूर्ण निवडक लेखांचे सचिन परब, प्रा. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, विश्वंभर चौधरी, सुनील कर्णिक यांच्या संपादन समितीमार्फत संपादन करून ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘जागर प्रबोधना’चा हा वैचारिक स्वरूपाचा उपक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण’ या विषयावर पुरोगामी विचारवंत, पत्रकार, अभ्यासक, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष मुलाखती घेण्यात येतील.























































